छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळ घाटात गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. आयशर ट्रक आणि १६ टायर ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन दोन निष्पाप जीवांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वेरूळ लेणीच्या क्रमांक एकच्या वरच्या भागात औद्योगिक टँकर घेऊन जाणारा आयशर ट्रक व १६ टायर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात औद्योगिक वापरासाठी नेण्यात येणाऱ्या टँकरचा बेल्ट तुटून टँकर रस्त्यावर आडवा पडला आणि त्याखाली वाहनातील प्रवासी दबले गेले.
या दुर्घटनेत वेरूळ येथील रहिवासी कचरू सांडू त्रिभुवन (वय ४२) व त्यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव (वय ६५, रा. राजीव गांधीनगर, खुलताबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. कचरू त्रिभुवन हे आपल्या सासूबाईंना खुलताबाद येथे सोडण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी कन्नडकडून संभाजीनगरकडे जाणारा आयशर ट्रक आणि खुलताबादकडून कन्नडकडे जाणारा १६ टायर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. टँकरचा बेल्ट तुटून टँकर रस्त्यावर आडवा पडल्यामुळे कचरू त्रिभुवन व त्यांच्या सासूबाई यांचा मृत्यू झाला.
सामाजिक कार्यकर्ते शेख मस्सीउद्दीन यांनी कचरू त्रिभुवन व त्यांच्या सासूला खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या दुर्दैवी अपघातामुळे वेरूळ गाव, खुलताबाद शहर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*