बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेशाची मागणी करण्यासाठी कन्नड तहसील कार्यालयावर शुक्रवारी (१९ सप्टेंबर) मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला कन्नडमधील गिरणी ग्राउंड मैदानापासून सुरुवात झाली. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात हजारो बंजारा समाजबांधव सहभागी झाले. या मोर्चाद्वारे बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करून आरक्षण टक्केवारी स्वतंत्रपणे मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील बंजारा जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार, नागपूर (एमपी) च्या शिफारशीसह हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटीच्या योजना व सवलती लागू केल्याचे अधिसूचना निर्गमित झाली होती. तसेच वसंतराव नाईक, तत्कालीन शासन आणि न्या. बापट आयोगाच्या शिफारशींनुसार बंजारा समाज सर्व निकष पूर्ण करीत असल्याचे राज्य शासनाने केंद्र सरकारकडे स्पष्ट करण्याची मागणी मोर्चात करण्यात आली.
मोर्चेकरांनी पिशोर नाका, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तहसील कार्यालय परिसरात महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज (पवरागड), उपोषणकर्ते ऋषिकेश चव्हाण व आकांक्षा चव्हाण यांनी संबोधन केले. बालिका व महंतांच्या हस्ते तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदनही दिले.
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोर्चाला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली. मोर्चेकऱ्यांना दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. शासकीय आकडेवारीनुसार मोर्चात हजारो बंजारा समाजबांधव सहभागी झाले. ग्रामीण भागातून विशेषतः तरुण, तरुणी व महिलांची उपस्थिती जास्त होती. मोर्चा मार्गात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत अल्पोपाहार व पाण्याची सोय करण्यात आली होती. कन्नड शहर पोलिसांनी निरीक्षक आर. बी. सानप व सपोनि. चांद मेंडके यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*