छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्णपुरा देवीच्या यात्रेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सतत गस्त घालत असताना मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात्रेतील गर्दीत एक २१ वर्षीय तरुण सैन्यदलातील जवानासारखा पोशाख करून फिरताना आढळून आला. दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला असून, संबंधित तरुणाविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवाडी (ता. पैठण) येथील लहु नामदेव राऊत असे या तोतया जवानाचे नाव आहे. तो इंडियन आर्मी टी-शर्ट, त्यावर “इंडियन आर्मी” असे लिहिलेला जॅकेट, सैनिकी टोपी, पॅंट व डी.एम.एस. बूट अशा पूर्ण गणवेशात यात्रेत फिरताना आढळला. पोलिस उपनिरीक्षक प्रवीणा यादव आणि दामिनी पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता सुरुवातीला त्याने स्वतःला उत्तराखंडमधील बटालियनचा जवान असल्याचे सांगितले. मात्र, पुढील विचारपूस करताना त्याची उत्तरे उडवा-उडवीची असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

याबाबत महिला पोलीस अनिता शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पथकात पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरघे, कल्पना खरात, सुनीता नागलोद, मोनिका दिवे, साक्षी चंद्रे, सुधाकर पवार व चालक बाळु वणे आदी उपस्थित होते. तर बंदोबस्तासाठी एम. वाळूज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आयुज देखील होते.

लहु राऊत याने चौकशीत सांगितले की, तो ३७ बटालियन सीएमपीमध्ये कार्यरत आहे आणि पुण्याजवळील खडकवासला येथे त्याचे प्रशिक्षण झाले होते. मात्र, जेव्हा त्याच्याकडे ओळखपत्र किंवा इतर कोणताही पुरावा मागविण्यात आला, तेव्हा तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे तोतया जवान म्हणून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे यात्रेत सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सतर्कता किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याच्या या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करून मोठी दुर्घटना टाळली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

7,004 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क