छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सर्व शासकीय, संस्थात्मक व खासगी रुग्णवाहिकांवर जीपीएस प्रणाली बसविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. रुग्णवाहिकाधारकांनी १ डिसेंबरपर्यंत स्वखर्चाने जीपीएस बसवून त्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक व नोंदणी निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अपर आयुक्त रणजित पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, पोलीस उपायुक्त भुजंग यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
निर्णयानुसार, जीपीएस न बसविणाऱ्या रुग्णवाहिकांवर पहिल्यांदा १० हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा २० हजार रुपये दंड व तिसऱ्यांदा वाहन जप्त करून नोंदणी निलंबन केली जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिका केवळ त्यांच्या रुग्णांसाठीच वापरल्या जातात. ही बाब गंभीर मानून अशा प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी जीपीएस प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. तसेच जीपीएस बसविलेल्या रुग्णवाहिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष व स्मार्टसिटी प्रणालीमार्फत जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध होईल.
बैठकीत ई-रिक्षांबाबतही निर्णय घेण्यात आले. सर्व ई-रिक्षांना मीटर बसविणे अनिवार्य करण्यात आले असून प्रवासी भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. विनाइंडिकेटर रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. महिला प्रवाशांशी गैरवर्तन झाल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही दिले गेले. तसेच जे रिक्षामालक आपली रिक्षा इतर चालकांना भाड्याने चालविण्यास देतात त्यांनी संबंधित चालकाचा परवाना, बक्कल, आधारकार्ड, पत्त्याचा पुरावा व मोबाईल क्रमांक प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक आहे.
याशिवाय, जिल्ह्यात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा वाहनांची तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधित वाहन ३० दिवसांसाठी जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे रुग्णवाहिका व प्रवासी वाहतूक सेवेत पारदर्शकता, शिस्त आणि सुरक्षितता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*