छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या अतिक्रमण पाडापाडी मोहिमेमुळे घर जाण्याच्या धास्तीने चिकलठाणा येथील तरुण शेतकरी राजेश्वर उर्फ मुन्ना साईनाथ नतपुते-गोटे (३०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली असून, या मोहिमेमुळे झालेला हा शहरातील पहिला बळी ठरला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नातलग व स्थानिकांनी जालना रोडवर मृतदेहासह ठिय्या देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोठ्या कष्टाने बांधलेले घर
नतपुते कुटुंब मूळ चिकलठाण्याचे रहिवासी आहे. त्यांचा महादेव मंदिरामागे वडिलोपार्जित जुना वाडा होता. मात्र, तो मोडकळीस आल्याने व कुटुंब वाढल्याने २०१३-१४ मध्ये राजेश्वर यांनी कष्टाने नवीन घर उभारले होते. कुटुंबात आई-वडील, आजीआजोबा, शिकवणी घेणारा भाऊ व त्याचे कुटुंब, पत्नी आणि चार महिन्याचे बाळ असे सर्व जण राहत होते. शेतीसोबतच राजेश्वर दूध विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा सांभाळ करत होते. मनपाच्या पाडापाडी मोहिमेमुळे घर जाण्याची भीती त्यांना सतावत होती. त्यामुळे त्यांनी चिकलठाणा आठवडी बाजारामागे भाड्याने घर घेऊन काही सामान तिथे हलवले होते.
बुधवारी दिवसभर शेतातील काम उरकून व रात्री परिसरात दूध पुरवल्यानंतर ते भाड्याच्या घरात गेले. मात्र, तणाव वाढत गेल्याने त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले.
गुरुवारी नेहमीप्रमाणे दूध विक्रेत्यांकडे न गेल्याने आणि मोबाईल बंद असल्याने विक्रेत्यांनी त्यांच्या भावाला संपर्क साधला. भाऊ व आई घराकडे धावले असता आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश केला असता राजेश्वर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडकोचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
संतप्त नातलगांचा ठिय्या
राजेश्वर यांच्या आत्महत्येनंतर कुटुंब व स्थानिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी “मनपा अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे न ऐकता एकांगी कारवाई केली” असा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दुपारी मिनी घाटीत मृतदेह नेण्यात आला. मात्र, मनपा अधिकारी येईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कुटुंबाने घेतला.
सायंकाळी मनपाचे अधिकारी मिनी घाटीत दाखल झाले. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, कुटुंबाने ठेवलेल्या घर, ५० लाखांची मदत व पत्नीला नोकरी या मागण्यांवर स्पष्ट भूमिका घेतली नाही. यामुळे कुटुंब व स्थानिकांनी मृतदेहासह जालना रोडवर ठिय्या दिला. त्यामुळे जालना रोड तब्बल तीन तास रस्ता ठप्प राहिला. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पोलिस प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा ताण सहन करावा लागला.
संतप्त प्रश्नांनी गप्प झाले अधिकारी
अतिक्रमण हटाव अधिकारी संजय सुरडकर यांनी पंतप्रधान घरकुल योजनेतून घर देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ‘नियमबाह्य घर असेल तर परवानगी का दिली? कर का घेतला? आता घर पाडल्यानंतर आम्ही करायचे काय?’ अशा संतप्त प्रश्नांचा भडिमार होताच अधिकारी गप्प बसले. अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत घालून सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला.
प्रशासनाविरोधात संताप कायम
या घटनेनंतर मनपा प्रशासनाविरोधात जनतेत तीव्र असंतोष व्यक्त होत असून, अतिक्रमण मोहिमेतील एकांगी कारवाईमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नयेत, अशी मागणी होत आहे. राजेश्वर यांच्या कुटुंबाची आर्त व्यथा ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. “तुम्हीच आता माझ्या मुलाला न्याय द्या” अशी आर्त विनंती राजेश्वर यांच्या वडिलांनी पोलिसांना केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*