छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर मुख्य रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात बुधवारी रात्री भीषण प्रकार घडला. काळ्या स्कॉर्पिओमधून आलेल्या तिघा युवकांनी धारदार शस्त्रांनी एका तरुणावर हल्ला केला आणि त्याच्यावर पिस्तुल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी जलद कारवाई करत तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली.
ही घटना बुधवार, २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. वडगाव (सहकारी) येथील मूळ रहिवासी व सध्या सिल्लोड येथे वास्तव्यास असलेले भोलानाथ शामराव कडिमंचे (३२) हे महाराणा प्रताप चौकातील बाजारपेठ संकुलात उभे होते. त्याचवेळी काळ्या स्कॉर्पिओमधून आलेल्या तिघा आरोपींनी अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी भोलानाथ यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता एका आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॅगझिन लोड करताना झालेल्या चुकीमुळे पिस्तुलातून गोळी खाली पडली आणि भोलानाथ यांचा जीव थोडक्यात वाचला.
जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ व्हॅली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जखमी भोलानाथ यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे अधिकारी प्रवीण वाघ यांच्या पथकाने जलद हालचाल केली. गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी गजानन महाराज मंदिर व जाधवमंडी परिसरातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
अटक केलेल्यांची नावे सागर भागवत भारस्कर (२७, रा. जाधववाडी गल्ली क्र. ६), योगेश नंदू सांगळे (३०, रा. स्वस्तिक सिटी) आणि राज संजय बर्फे (२०, रा. फुलेनगर, पंढरपूर) अशी आहेत. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विशाल बोडखे, संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली भीती पोलिसांच्या तत्परतेमुळे काहीशी कमी झाली आहे. तथापि, या हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*