छत्रपती संभाजीनगरातील समर्थनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करून दोन भामट्यांनी तीन दिवसांत तब्बल ११ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा घोटाळा केला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
हा प्रकार १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान घडला. फिर्यादी तुषार जोगदंड (३२, रा. शाहूनगर, बीड) हे एसबीआय शाखेत प्रबंधक आहेत. त्यांनी तक्रारीत नमूद केले की, २३ सप्टेंबर रोजी तपासणीदरम्यान बँकेच्या अंतर्गत खात्यातून ११ लाख ४६ हजार ५०० रुपये कपात झाल्याचे निदर्शनास आले, मात्र खातेदारांच्या खात्यातून रक्कम वजा झालेली नव्हती. तपासात हे स्पष्ट झाले की, अज्ञात व्यक्तींनी एटीएममध्ये छेडछाड करून फसवणूक केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये २२ ते २५ वर्ष वयोगटातील दोन तरुण दिसून आले आहेत. त्यांनी एचडीएफसी, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, ऍक्सिस बँक यांसह इतर बँकांचे १० ते १२ डेबिट कार्ड वापरून वारंवार ८ ते १० हजार रुपयांची रक्कम काढली. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे व्यवहार होत राहिले. या तीन दिवसांत तब्बल १८० ट्रॅन्झेक्शन करून साडेअकरा लाख रुपये काढण्यात आले.
भामट्यांनी एटीएम मशीनची दिशाभूल करण्याची नवी पद्धत वापरली. ते पैसे बाहेर येताना मशीन बंद करीत आणि त्यावेळी बोट लावून रक्कम काढून घेत. त्यामुळे बँकेच्या खात्यातून रक्कम कपात झाली, पण ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा झाले नाहीत. हा या भागातील पहिलाच प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयित दोन्ही आरोपी परप्रांतीय असून, त्यांना एटीएम सिस्टीमची चांगली माहिती असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी संबंधित बँकांकडून व्यवहार व कार्डधारकांची माहिती मागवली असून, तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत. या प्रकारामुळे बँक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*