छत्रपती संभाजीनगर : फटाका स्टॉल लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी विक्रेत्यांकडून लाच घेताना जीएसटी विभागातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले. बुधवारी (दि.१) सायंकाळी जीएसटी भवन येथे सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्यांमध्ये वर्ग-२ राज्य कर अधिकारी सुरेश दादाराव जाधव (५४) आणि कर सहायक दुर्गादास धोंडीराम जाधव (३९) यांचा समावेश आहे. फटाका असोसिएशनमार्फत शहरातील सर्व विक्रेत्यांची परवाना प्रक्रिया पार पाडली जाते. याच प्रक्रियेत विक्रेत्यांनी फटाका स्टॉल लावण्यासाठी अर्ज केला होता. अर्जासोबत त्यांनी शासनाकडे आवश्यकतेनुसार प्रत्येकी १,१०० रुपयांचे चालान भरले होते.

मात्र, राज्य कर अधिकारी सुरेश जाधव यांनी प्रत्येक चालानमागे ३०० रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार दिल्यावर विक्रेत्यांना परवाना मिळवण्यासाठी वारंवार चकरा मारायला लावल्या जात होत्या. या अन्यायामुळे संतप्त विक्रेत्यांनी थेट एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे धाव घेतली. तक्रारीची खातरजमा पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे आणि योगेश शिंदे यांनी केली. तपासात अधिकारी आणि सहाय्यक लाच मागत असल्याचे उघड झाले.

त्यानंतर आरोपींनी तडजोडीअंती प्रत्येक चालानासाठी २५० रुपये लाच घेण्याचे ठरवले. एकूण ३० विक्रेत्यांकडून साडेसात हजार रुपयांची लाच घेण्याचा व्यवहार पक्का झाला. एसीबीच्या पथकाने बुधवारी जीएसटी भवनात सापळा रचला. त्यावेळी कर सहाय्यक दुर्गादास जाधव याने विक्रेत्याकडून लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर राज्य कर अधिकारी सुरेश जाधव यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईमुळे फटाका विक्रेत्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून, जीएसटी विभागातील भ्रष्टाचाराचे धागेदोरे समोर आले आहेत. दोन्ही आरोपींविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,189 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क