महाराष्ट्रातील मराठवाडा भाग सध्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला असला, तरी पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी कामगिरी करून दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कैलास रामभाऊ कुंटेवाड यांनी अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती (KBC 17) मध्ये तब्बल ५० लाख रुपये जिंकले आहेत. सोमवारी (३० सप्टेंबर) प्रदर्शित झालेल्या भागात त्यांची ही ऐतिहासिक कामगिरी दाखवण्यात आली.

कैलास कुंटेवाड हे मूळचे साधे शेतकरी असून महिन्याला केवळ तीन ते चार हजार रुपयांची कमाई करतात. घरची गरीबी, ग्रामीण जीवन आणि शेतीची जबाबदारी सांभाळताना त्यांनी क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही. मात्र, आपल्या दोन मुलांच्या माध्यमातून हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. या जिंकलेल्या पैशातून ते मुलांना उत्तम क्रिकेट प्रशिक्षण देऊन त्यांचं करिअर घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

शोमध्ये सुरुवातीपासूनच त्यांनी कमालीची धडाकेबाज कामगिरी केली. पहिले दहा प्रश्न त्यांनी एकाही लाईफलाइनशिवाय बरोबर दिले. ११ वा प्रश्नही त्यांनी सहज सोडवला. १२ व्या प्रश्नावेळी थोडा गोंधळ झाल्याने त्यांनी ‘ऑडियन्स पोल’ ही लाईफलाइन वापरली. प्रेक्षकांच्या मदतीने उत्तर बरोबर आल्यानंतर ही लाईफलाइन पुन्हा सक्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर आधारित १३ वा आणि १४ वा प्रश्न बिनचूक सोडवला आणि ५० लाख रुपये जिंकले. त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करत अमिताभ बच्चन म्हणाले, “भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट तू करून दाखवलीस!”

मात्र १ कोटी रुपयांच्या १५ व्या प्रश्नावर ते थोडे अडखळले. हा प्रश्न होता – “अमेरिकन कोलोनायझेशन सोसायटीने मुक्त झालेल्या गुलामांना आफ्रिकेत पुनर्वसन देण्याच्या कार्यामुळे कोणता देश निर्माण झाला?” पर्याय होते – A. लायबेरिया, B. सिएरा लियोन, C. घाना, D. नायजेरिया. कैलास यांनी ‘संकेत सूचक’ आणि नंतर ‘५०-५०’ या दोन लाईफलाइन वापरल्या, पण तरीही A आणि B या पर्यायांमध्ये गोंधळल्याने त्यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. परिणामी ५० लाखांची सुरक्षित रक्कम त्यांनी जिंकली.

या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं – A. लायबेरिया. हा देश १८४७ मध्ये अमेरिकन कोलोनायझेशन सोसायटीच्या प्रयत्नांतून स्थापन झाला.

गरीब शेतकरी असूनही आत्मविश्वास, ज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर कैलास कुंटेवाड यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एक वेगळी प्रेरणा दिली आहे. सध्याच्या नैसर्गिक संकटाच्या काळात त्यांचा हा विजय अनेकांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,653 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क