छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑरिक (AURIC) बिडकीन औद्योगिक क्षेत्रात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दोन नामांकित कंपन्यांनी तब्बल ४७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे सुमारे २३०० तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
गोदावरी एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीला या टप्प्यात ११४ एकर औद्योगिक जागा देण्यात आली आहे. कंपनीकडून ४४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, बॅटरी पॅक, सोलार एनर्जी तसेच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राशी संबंधित उत्पादन येथे होणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास २१०० नागरिकांना थेट रोजगार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हरित उर्जेच्या दिशेने भारत पुढे जात असताना ही गुंतवणूक ‘ग्रीन एनर्जी हब’च्या निर्मितीकडे एक मोठे पाऊल म्हणून पाहिली जात आहे.
दरम्यान, जपानमधील प्रसिद्ध सँजो कंपनीलाही ऑरिकमध्ये २० एकर जागा देण्यात आली आहे. टोयोटा कंपनीसाठी वाहनांचे सुटे भाग पुरवणारी ही कंपनी ३५२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, या प्रकल्पातून सुमारे २०० रोजगार निर्मिती होणार आहे.
या गुंतवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक नकाशावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही वाढती औद्योगिक हालचाल महाराष्ट्रासाठी सकारात्मक दिशा दाखवणारी ठरत आहे. दसऱ्याच्या या शुभमुहूर्तावर झालेली गुंतवणुकीची घोषणा ‘औद्योगिक संभाजीनगर’ या संकल्पनेला नवे बळ देणारी ठरली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*