छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा जल्लोष सुरू होताच शहरात फटाका बाजारांची रंगत वाढली आहे. शहरातील अयोध्यानगरी, कलाग्राम, टीव्ही सेंटर, एमआयटी कॉलेजसमोरील मैदान, केंब्रिज शाळेजवळील मैदान आणि छावणी बाजार मैदान या सहा प्रमुख ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटण्यात आली असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
या सहा ठिकाणी एकूण २१२ फटाका दुकाने उभारण्यात आली आहेत. त्यात अयोध्यानगरी मैदानावर ६४, कलाग्राम मैदानावर ५०, टीव्ही सेंटर मैदानावर ४४, एमआयटी कॉलेजसमोरील मैदानावर २२, केंब्रिज शाळेजवळील मैदानावर २१ आणि छावणी गुरुवार बाजार मैदानावर ११ दुकाने उभारली आहेत. तसेच वाळूज परिसरात दोन ठिकाणी ३३ दुकाने थाटण्यात आली आहेत.
शिवकाशी येथून थेट फटाक्यांची आवक सुरू झाली असून, विक्रेत्यांनी विविध आकर्षक फटाक्यांचा साठा उपलब्ध केला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सर्व विक्रेत्यांना आवश्यक ती एनओसी देऊन विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांसह विक्री सुरू झाली आहे.
फटाक्यांच्या बाजारामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, छोट्या-मोठ्या फटाक्यांपासून ते आकाशात झळकणाऱ्या रंगीत रोषणाईपर्यंत सर्व वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दरम्यान, नागरिकांनी फटाके फोडताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, तसेच लहान मुलांकडून फटाके हाताळताना पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*