मनपाच्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न सुटला; दिवाळीपूर्वी मिळणार भरीव वेतन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील तब्बल दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रशासनाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आंदोलन आणि तणावात असलेल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

महाराणा एजन्सीमार्फत महापालिकेत १६०० कर्मचारी कार्यरत होते. मात्र, मागील महिन्यात मनपाने या एजन्सीचे कामकाज थांबवून कर्मचाऱ्यांना गॅलक्सी आणि अशोका या दोन नव्या एजन्सीकडे वर्ग केले. यामुळे जून आणि जुलै महिन्याच्या पगाराचे संकट निर्माण झाले होते. जुन्या एजन्सीकडून पगार मिळणे शक्य नव्हते, तर नवीन एजन्सींना त्या दोन महिन्यांचा पगार देणे कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे होते.

या पेचप्रसंगावर उपाय शोधण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून प्रशासन स्तरावर चर्चा सुरू होती. अखेर प्रशासक जी. श्रीकांत यांनी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे व अन्य अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन निर्णय घेतला. कायदेशीर पडताळणीनंतर मनपाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने जून आणि जुलै महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात मंगळवारी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

हजेरी अॅपनुसार उपस्थिती तपासून पगाराची प्रक्रिया राबवली जाणार आहे. भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ईएसआयसीची कपात केल्यानंतर उर्वरित संपूर्ण रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाईल. याशिवाय ऑगस्ट महिन्याचा पगारही मनपा प्रशासन स्वतःच करणार असून त्याची तयारी सुरू आहे.

या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत कर्मचाऱ्यांनी केले असून, “दिवाळीपूर्वी मिळालेला पगार ही आनंदाची बातमी आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

791 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क