शहरातील मंदिरांत ठेवले जाणार ‘निर्माल्य कलश’; मनपाचा अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रमांचा ध्यास घेतला असून, गणेशोत्सव काळात तयार केलेले ‘निर्माल्य कलश’ आता शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्तम संगम साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सव काळात नागरिकांनी मूर्ती विसर्जनावेळी पुष्पहार, दुर्वा, फळे, वस्त्र, कापूस आदी वस्तू मूर्तीसोबतच विसर्जनाच्या ठिकाणी टाकण्याची प्रथा आहे. हे सर्व ‘निर्माल्य’ पवित्र मानले जात असले तरी त्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मागील वर्षापासूनच निर्माल्य वेगळे गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर शहरातील बागा आणि उद्यानांमध्ये करण्यात येतो.

यावर्षी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी गणेशोत्सवात वापरण्यासाठी विशेष डिझाइनचे ‘निर्माल्य कलश’ बनविण्याचा निर्णय घेतला होता. हे कलश शहरातील सर्व प्रमुख विसर्जन विहिरी आणि तलावांवर ठेवण्यात आले होते, जिथे नागरिकांनी आपले निर्माल्य श्रद्धेने जमा केले. गणेशोत्सव संपल्यानंतर हे कलश निष्क्रिय राहिले असल्याने त्यांचा सातत्याने वापर व्हावा, या उद्देशाने आता ते शहरातील मोठ्या मंदिरांमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

महापालिकेचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, लवकरच शहरातील २५ प्रमुख मंदिरांमध्ये हे निर्माल्य कलश ठेवले जातील. मंदिरातील भक्तांनी पूजा केल्यानंतर उरलेले निर्माल्य या कलशांमध्ये जमा करता येईल. जेव्हा हे कलश भरतील, तेव्हा त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास मनपाचे वाहन ते निर्माल्य गोळा करण्यासाठी येईल. यामुळे मंदिर परिसर स्वच्छ राहील आणि निर्माल्याचे पावित्र्यही जपले जाईल.

या उपक्रमांतर्गत ज्या मंदिरांत कलश ठेवले जाणार आहेत, त्यात खडकेश्वर महादेव मंदिर, इस्कॉन मंदिर ट्रस्ट (भाग्यनगर), समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टचे श्री समर्थ राम मंदिर, गणेश सभा (समर्थनगर), शनी मंदिर (विवेकानंद कॉलेज समोर), रामचंद्र मंदिर मठबालाजी ट्रस्ट (किराडपुरा), हरसिद्धी माता मंदिर (हसूल), ओंकारेश्वर मंदिर (मयूरपार्क), स्वामी समर्थ केंद्र (हडको), गणपती महादेव मंदिर (एकतानगर), महादेव मंदिर (सुरेवाडी), काळा गणपती मंदिर, मारुती महादेव मंदिर (गुलमोहर कॉलनी), तसेच विठ्ठल-रुखमाई मंदिर (एन-७ सिडको), रेणुका माता मंदिर (शिवनेरी कॉलनी) आणि दत्त मंदिर (बीड बायपास) यांचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे धार्मिक स्थळांवर निर्माल्य विसर्जनाची अव्यवस्था कमी होईल, तसेच शहरातील स्वच्छता मोहिमेला बळ मिळेल. नागरिकांनीही या संकल्पनेला मोठा प्रतिसाद दिला असून, अनेक भक्तांनी ‘निर्माल्य कलश’ ठेवण्याचे स्वागत केले आहे. हा उपक्रम शहरातील इतर धार्मिक ठिकाणीही राबविण्याचा महापालिकेचा विचार असून, छत्रपती संभाजीनगर महापालिका पर्यावरण-जागरूक शहर म्हणून ओळख मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

464 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क