छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच शहरात तब्बल ३४ नवीन ई-बस दाखल होणार असून, त्यासाठी जाधववाडी येथील बस डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

सध्या स्मार्ट सिटीच्या ताब्यात १०० डिझेल बस आहेत, त्यापैकी जवळपास २० बस बंद पडल्या असून उर्वरित ८० बस शहर आणि ग्रामीण भागातील विविध मार्गांवर धावत आहेत. २०१८ मध्ये सुरू झालेली स्मार्ट सिटी बससेवा सध्या दररोज २० ते २२ हजार प्रवाशांना सुविधा पुरवते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून वाळूज, फुलंब्री, करमाड, पैठण रोड आदी भागांत बससेवेची मागणी वाढली आहे.

डिझेल बसच्या वाढत्या इंधन आणि देखभाल खर्चामुळे पर्यावरणपूरक ई-बस आणण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हैद्राबाद येथील एका खासगी एजन्सीबरोबर करार करून ३५ ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, चार्जिंग स्टेशनचे काम अपूर्ण राहिल्याने बस वेळेत आणता आली नव्हती.

चार्जिंग स्टेशनसाठी महावितरणकडून एचटी लाईन, स्वतंत्र फिडर आणि विजेचे उपकेंद्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते, जे आता पूर्णत्वास आले आहे. अंतिम टप्प्यात शेड बांधणीचे काम सुरू असून, पुढील महिनाभरात सर्व ३४ बस शहरात दाखल होतील, अशी माहिती बस विभागाचे मुख्य चालान अधिकारी संजय सुपेकर यांनी दिली.

दरम्यान, हैद्राबाद कंपनीने एक ई-बस १ सप्टेंबर २०२५ रोजी शहरात पाठविली असून ती सध्या शहरालगतच्या मार्गांवर प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. या बसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, उर्वरित बस आल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुलभ व पर्यावरणपूरक होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

872 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क