कन्नड तालुक्यातील पानपोई फाटा येथील उपबाजार समितीत टोमॅटोला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर–धुळे महामार्गावर तब्बल पाचशे ट्रॅक्टर उभे करून रास्ता रोको आंदोलन छेडले. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी सुमारे दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांसह वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले.

कन्नड तालुक्यातील शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी पानपोई फाटा उपबाजार समितीत माल आणतात. गुरुवारी त्यांना टोमॅटोचे दर १५ ते २० रुपये किलो मिळाले होते. मात्र, शुक्रवारी व्यापार्‍यांनी अचानक दर पाडून १० ते १२ रुपये किलोपर्यंत आणला. याशिवाय कॅरेटमागे १० रुपयांची कपात आणि व्यापार्‍यांकडून होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीमुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी माल विकण्यास नकार देत बाजारात घोषणाबाजी केली. त्याचवेळी व्यापाऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्याने वातावरण तापले आणि शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला.

दुपारी सुमारे चार वाजता शेतकऱ्यांनी टोमॅटोने भरलेले पाचशे ट्रॅक्टर सोलापूर–धुळे महामार्गावर उभे करून तीव्र घोषणाबाजी केली. “आमच्या मालाला योग्य दर द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वाढता वाहतूक खर्च, माल खराब होण्याचा धोका आणि बाजारातील अन्यायकारक दर या सर्व कारणांमुळे शेतकरी महामार्गावरून हटण्यास तयार नव्हते.

या रास्ता रोकोमुळे छत्रपती संभाजीनगरकडून हतनूरपर्यंत, तर कन्नडकडून अंधानेर फाट्यापर्यंत वाहतुकीचा ताण निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कन्नड पोलिस ठाण्याचे पोनि. सानप व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांच्या चर्चेनंतर परिस्थिती आटोक्यात आली. शेतकऱ्यांची समजूत काढत टोमॅटोच्या भावाबाबत व अन्य तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पाच तासांनी आंदोलन मागे घेतले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

922 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क