जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. तब्बल २.५ कोटी रुपयांच्या सुपारीचा कट उघडकीस आल्याचा दावा करत त्यांनी या कटामागे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. जरांगे पाटील यांच्या या धक्कादायक आरोपाने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे बीडमधील कांचन नावाचे व्यक्ती दोन संशयितांना घेऊन परळी येथे गेले. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी झाल्टा फाट्याजवळ आरोपी आणि धनंजय मुंडे यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही त्याला गाडीने  ठोकतो,” असे आरोपी म्हणाले असता, “मी तुम्हाला जुनी गाडी देतो,” असे मुंडे म्हणाल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या कटासाठी आधीच ५० लाख रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या गंभीरतेचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले. “खून करून कोणाचेही राजकारण मोठे होत नाही. तुम्ही शांत राहा, म्हणजे मला सुखाचे दिवस आणता येतील. मी सतर्क असल्यामुळे आज वाचलो,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. तसेच, या प्रकाराकडे केवळ मराठा समाजानेच नाही, तर राज्यातील सर्व ओबीसी आणि मुस्लिम नेत्यांनीही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “आज माझ्यावर बेतलं, उद्या तुमच्यावरही बेतू शकतं,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. तक्रारीनुसार तातडीने कारवाई करत बीडच्या गेवराईमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाला अतिसंवेदनशील मानून तपासाची गती वाढवली आहे.

जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा आरोप राजकीय स्तरावर किती मोठा प्रभाव निर्माण करतो, आणि पुढील तपासातून काय नवे तथ्य समोर येतात, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,210 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क