बीड : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘माझ्या हत्येचा कट रचला’ असा थेट आणि गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच चढले आहे. या प्रकरणावर आज परळी येथे पत्रकार परिषद घेत मुंडे यांनी जोरदार प्रत्यूत्तर देत आरोप संपूर्णपणे फेटाळून लावले. “कट प्रकरणी बोलणारे, अटक झालेले आणि कबुली देणारे सर्वजण जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत. माझा या प्रकरणाशी दूरपर्यंतही संबंध नाही,” असा दावा मुंडे यांनी केला.
जरांगे पाटील यांनी केलेल्या अडीच कोटींच्या सुपारी, भाऊबीजेची भेट, तसेच कटासाठी जुनी गाडी देण्याचे आश्वासन या सर्व आरोपांना फेटाळून लावत मुंडे म्हणाले, “ सत्य बाहेर आलेच पाहिजे. मी स्वतः सीबीआय चौकशीची मागणी करतो.” यासोबतच त्यांनी स्वतःची आणि जरांगे पाटील यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची तयारीही जाहीर केली.
मुंडे यांनी यावेळी जरांगे यांच्या आंदोलनातील भूमिकेवरही निशाणा साधला. “अंतरवाली येथून एका समाजाला संपवण्याची भाषा सुरू झाली आणि दोन समाजांमध्ये फूट पडली. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतले आहे, पण थोतांड करू नका. आम्ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडतो म्हणून आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत,” असे ते म्हणाले.
यापूर्वी एका सभेत टीका करून मुंडे शांत झाले होते. मात्र आता त्यांनी या प्रकरणावर कायदेशीर पावले उचलण्यासाठी वकिलांशी चर्चा सुरू केल्याचे सांगितले. “हे आरोप फक्त राजकीय प्रसिद्धीसाठी केले आहेत. सत्य बाहेर येऊ द्या, मग सर्वांना कळेल,” असे मुंडे यांनी शेवटी नमूद केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*