छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या दावरवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या दगडांच्या हल्ल्यातून २५ लाख रुपयांची लूट झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पैठण–पाचोड मार्गावर घडली होती. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत लूट प्रकरणाचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक करून चोरी गेलेली संपूर्ण रोकड जप्त केली आहे. या तातडीच्या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

मुख्य आरोपी म्हणून भारत राजेंद्र रूपेकर (३०, रा. नानेगाव) याची नावे पुढे आली आहेत. त्याच्यासोबत विष्णू बोधणे (२४), सचिन सोलाट (२५) आणि विशाल चांदणे (२४) यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार आणि आठ मोबाइल जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे ग्रामपंचायत सदस्यांचे पुत्र असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगत आहे.

तपासात उघडकीस आले की, भारत रूपेकर हा या कटाचा सूत्रधार असून त्याने ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी या टोळीचे नियोजन केले होते. त्याने आठ दिवस सतत रेकी करून लूट प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. दरोड्याच्या दिवशी त्याने बँकेत पैसे जमा करण्यासाठी पत्नीचा मोबाइल नंबर स्लिपवर लिहिला होता. याच चुकांमुळे पोलिसांचा संशय त्याच्याकडे वळला. सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवहारांच्या स्लिप तपासताना पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि रूपेकरला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

घटनेत सेवानिवृत्त कर्मचारी गणेश पहिलवान (६५) हे २५ लाखांची रोकड घेऊन स्कूटीवर दावरवाडीकडे निघाले असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्यावर दगडांनी व लाथांनी हल्ला करून बॅग हिसकावून नेली होती. पहिलवान यांच्यावर रोज मोठ्या प्रमाणात रोकड वाहतूक करण्याची जबाबदारी होती, याची माहिती मिळाल्याने आरोपींनी त्यांना टार्गेट केले होते.

लुटलेल्या रकमेपैकी रूपेकरने स्वतःसाठी १० लाख घेतले होते, तर इतर तिघांना प्रत्येकी ५ लाखांची वाटणी करण्यात आली होती. पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे जप्त झाली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,363 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क