छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अंत्यसंस्काराची पावती मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मनपाचा कंत्राटी कर्मचारी आणि झेरॉक्स सेंटर चालक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता झोन सहामध्ये करण्यात आली. फिरोज जाफर खान (४५, रा. रोजाबाग) आणि शेख कडू इब्राहिम (५३, रा. चिकलठाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदाराच्या चुलत भावाचा जून २०२४ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी घेतलेली अंत्यविधी पावती गहाळ झाल्याने मृताच्या पत्नीने ११ नोव्हेंबर रोजी नवी प्रत मिळण्यासाठी मनपाच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या आरोपी फिरोज खानने पावती आणि संबंधित कागदपत्रे देण्यासाठी १,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला तीन दिवस सतत चकरा मारायला लावूनही काम न झाल्याने त्याने १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

अधीक्षक कांगणे यांनी पोलिस निरीक्षक योगेश शिंदे आणि वाल्मीक कोरे यांना तक्रारीची खातरजमा करण्याचे निर्देश दिले. तपासादरम्यान आरोपी फिरोजने पंचासमक्ष १,००० रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. तडजोड म्हणून किमान ५०० रुपये देण्याची अट घालण्यात आली. खात्री पटल्यावर पथकाने कार्यालयाबाहेर सापळा रचला.

फिरोजच्या सांगण्यानुसार तक्रारदाराने ५०० रुपये कार्यालयाबाहेरील झेरॉक्स सेंटर चालक शेख कडू इब्राहिम याच्याकडे द्यायचे होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर शेख कडूने ते स्वीकारताच पथकाने तत्काळ धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालयात असलेल्या फिरोजलाही अटक करण्यात आली. या कारवाईने मनपातील लाचखोरीविरोधात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,039 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क