छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडीची समस्या तीव्र झाली आहे. अनेकदा हॉर्नांचा आवाज, वाहतूक ठप्प स्थिती तसेच अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील वाहतूक व्यवस्थापन शिस्तबद्ध करण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली आहे. काही दिवसांपासून मनपाच्या पथकांनी मुख्य रस्त्यांवर पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, जप्त केलेल्या वाहनधारकाकडून २ हजार रुपये दंड आकारला जात आहे.
कारवाई आणखी प्रभावी करण्यासाठी मनपाने १ कोटी ५ लाख रुपये खर्चून पाच नवीन टोइंग वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने शहरातील प्रमुख रस्त्यांवर तैनात होणार आहेत. यामुळे अनधिकृत पार्किंगवर आता कठोर नियंत्रण येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येसाठी महापालिकेने १ कोटी ६० लाख रुपये खर्चून अत्याधुनिक पॉट होल रिपेयर मशीन खरेदी केले आहे. या वाहनांचे लोकार्पण प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
हे मशीन थंड डांबर वापरून मोठे खड्डेही काही मिनिटांत भरू शकते. अहमदाबाद व सुरत येथे यशस्वी वापराचे प्रात्यक्षिक पाहून छत्रपती संभाजीनगर मनपाने ते खरेदी केले आहे. कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी लवकरच मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर या मशीनद्वारे खड्डे दुरुस्ती मोहीम सुरू होणार आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटी प्रशासनाच्या मदतीने नवे पार्किंग धोरणही तयार केले जात आहे. नवीन वर्षात शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुस्थितीत पार्किंगची सोय उपलब्ध होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*