छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा प्रथमच प्रभाग पद्धत राबवली जात असून, या नव्या पद्धतीमुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक असून, चारही मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही, अशी स्पष्ट माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने एकूण २९ प्रभाग निश्चित केले आहेत. यामध्ये २८ प्रभागांत प्रत्येकी चार नगरसेवक असतील, तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. शहरात पहिल्यांदाच या पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येत आहे.
मतदान प्रक्रियेदरम्यान एखाद्या मतदाराने एक किंवा दोन उमेदवारांना मत दिल्यानंतर उर्वरित मत देण्यास नकार दिल्यास काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे की, अशा परिस्थितीत मतदान केंद्रावरील उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्षाला उर्वरित मते ‘नोटा’ या पर्यायाला देण्याचा अधिकार आहे.
यासंदर्भात निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी माहिती देताना सांगितले की, प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मतदान करणे अनिवार्य आहे. चार मते दिल्यानंतर ईव्हीएम मशीनवर बीप आवाज येईल आणि त्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जाईल.
एका मतदाराला चार मते द्यावी लागणार असल्याने मतदानासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान कसे करून घेता येईल, यावर सर्वच उमेदवार आणि पक्षांचा भर राहणार आहे. मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी मनपा प्रशासनाने मतदानाविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*