छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यास प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. ही यादी २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी सुधारित कार्यक्रम जाहीर करत, ३ जानेवारी २०२६ पर्यंत महापालिका निहाय संपूर्ण मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रथमच प्रभाग पद्धत राबवली जात असून, प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराला किमान चार उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक राहणार आहे. या नव्या पद्धतीमुळे मतदान प्रक्रियेला अधिक वेळ लागू शकतो, हे लक्षात घेऊन प्रशासनाने एका मतदान केंद्रावर सुमारे ९०० मतदारांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार शहरभर मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदारांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे, याची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रभागातील कोणत्या केंद्रावर मतदान करायचे आहे, हे मतदारांना सहज कळणार आहे. त्यामुळे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण २९ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक मतदार यादीत ११ लाख १८ हजार २८३ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी एकूण १,२६४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध होण्याकडे उमेदवारांसह सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागले असून, या यादीनंतर निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*