छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना भरावा लागणारा तब्बल १९ पानांचा उमेदवारी अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा अर्ज केवळ औपचारिक नसून उमेदवाराची संपूर्ण माहिती, म्हणजेच जणू काही त्याची “अख्खी कर्मकुंडली”च त्यात समाविष्ट करावी लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून इच्छुक उमेदवारांची ही किचकट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे.
उमेदवारी अर्जात एखादीही चूक झाली तर अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, एकदा अर्ज बाद झाला तर त्यावर अपील करण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने उमेदवार कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे स्वतः अर्ज भरण्याऐवजी तज्ज्ञ व्यक्ती किंवा कायदेशीर सल्लागारांची मदत घेण्याकडे उमेदवारांचा कल वाढला आहे.
संभाजीनगर शहरात अनेक वकिलांनी थेट आपल्या घराबाहेर “एक लाख रुपये द्या आणि आम्ही उमेदवारी अर्ज भरून देऊ” असे फलक लावले आहेत. अर्जाची प्रक्रिया अतिशय किचकट आणि तांत्रिक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना वकिलांकडे नंबर लावून अर्ज भरून घ्यावा लागत असून, त्यासाठी तब्बल एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण निवडणूक लढवण्याची संधी हातातून जाऊ नये, म्हणून उमेदवार हा खर्च करण्यास भाग पडत आहेत.
या प्रक्रियेचा सर्वाधिक फटका नवख्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना बसताना दिसतो आहे. आधीच निवडणूक खर्चाचे गणित जुळवणे अवघड असताना, अर्ज भरण्यासाठीच मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने अनेकांची आर्थिक कसरत होत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची अधिकृत किंमत केवळ १०० रुपये आहे. मात्र अर्ज दाखल करताना उमेदवाराला त्याच्या मालमत्तेची सविस्तर माहिती, मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याची माहिती, प्रलंबित खटल्यांचा तपशील तसेच अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे. या सर्व बाबींची अचूक पूर्तता करण्यासाठी उमेदवारांना मोठी काळजी घ्यावी लागत असून, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणेच एक मोठे आव्हान ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*