छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. सकाळ व संध्याकाळी जाणवणारा गारवा, दुपारी वाढलेली उष्णता आणि अचानक वाढलेली आर्द्रता यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी यांसारख्या तक्रारी घेऊन रुग्ण शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत. विशेषतः गेल्या आठवड्यापासून अशा रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
हवामानातील सतत होणाऱ्या चढ-उतारांचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आधीपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बसत आहे. अनेक रुग्णांमध्ये कोरडा खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येत असून काही ठिकाणी व्हायरल तापाचे रुग्णही आढळून येत आहेत. शाळकरी मुले आणि कामानिमित्त दररोज घराबाहेर पडणारे नागरिक व्हायरल संसर्गामुळे त्रस्त असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मेडीकल व औषध दुकानदारांकडे सर्दी-खोकला, तापावरील औषधांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने संसर्ग वेगाने पसरतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सकाळ-संध्याकाळ गरम कपडे वापरणे, पुरेसे पाणी पिणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, खोकताना-शिंकताना स्वच्छतेची काळजी घेणे, तसेच आजाराची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वतःहून औषधे घेणे टाळावे, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे. पुढील काही दिवसांतही हवामानात चढ-उतार राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*