छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून आता या टोळीने एका नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदार महिलेलाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पडेगाव कचरा डेपो परिसरातील समृद्धी जनरल स्टोअरमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता हा प्रकार घडला असून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत लंपास केली आहे.

या प्रकरणी सुजाता संदीप धीवर (वय ३३, रा. मिटमिटा) यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच जनरल स्टोअर व कॉस्मेटिकचे दुकान सुरू केले होते. घटनेच्या वेळी त्या दुकानात एकट्याच होत्या.

सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून दोन तरुण दुकानासमोर आले. त्यापैकी एक आरोपी दुचाकीवरच बसून राहिला, तर दुसरा दुकानात शिरला. त्याने अत्यंत साध्या पद्धतीने सुजाता यांच्याकडे ४० ते ५० रुपयांची बोरोलीन क्रीम मागितली. सुजाता क्रीम काढण्यासाठी काउंटरजवळ गेल्या असता, क्षणात आरोपीने त्यांच्या अंगावर झडप घालून गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावली.

चोरटा धावत बाहेर गेला आणि साथीदारासोबत दुचाकीवरून भरधाव निघून गेला. सुजाता यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,152 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क