छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयात गुरुवारी एक धक्कादायक आणि दुर्मीळ वैद्यकीय घटना समोर आली. साधारणपणे ६० ते ८० ग्रॅम वजनाची असणारी गर्भपिशवी आणि त्याच गर्भपिशवीत तब्बल सात मोठ्या गाठी आढळून आल्या. या गाठींचे एकूण वजन जवळपास दोन किलो इतके होते. सतत रक्तस्राव, पोटात गोळा जाणवणे आणि झपाट्याने कमी होत असलेले हिमोग्लोबिन अशा गंभीर तक्रारी घेऊन आलेल्या ४८ वर्षीय महिलेवर स्त्रीरोग विभागाने अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचविला.

महिला काही दिवसांपासून प्रचंड रक्तस्रावामुळे त्रस्त होती. तपासणीत गर्भाशयात अनेक मोठ्या गाठी असल्याचे स्पष्ट झाले. या गाठींमुळे गर्भपिशवीची नैसर्गिक रचना पूर्णपणे बदलली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान छोट्या गर्भपिशवीतून सात मोठ्या गाठी बाहेर काढण्यात आल्या, ज्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट ठरली. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

या शस्त्रक्रियेत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. लता वेडेकर, डॉ. संजय चव्हाण, डॉ. अर्चना वसुकर यांच्यासह परिचारिका व निवासी डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तज्ज्ञांच्या मते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अशा गाठी निर्माण होऊ शकतात. आनुवंशिकता, लठ्ठपणा, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळेही धोका वाढतो.

अतिरिक्त रक्तस्राव, पाळी जास्त दिवस चालणे, पोटात गोळा जाणवणे, कंबरदुखी, थकवा आणि हिमोग्लोबिन कमी होणे ही लक्षणे दिसल्यास महिलांनी त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

859 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क