छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराचे २३ वे महापौर भाजपचेच होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर आता शहराला पुन्हा एकदा लोकनिर्वाचित प्रथम नागरिक मिळणार असून, त्यासाठी मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महापौर दालनासह पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे आणि सर्वसाधारण सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून, महापौर दालनात विशेष लक्ष वेधून घेणारी अत्याधुनिक खुर्ची दाखल झाली आहे.

२०२० पासून विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक लांबत राहिल्याने महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेत्यांची दालने अनेक महिने ओस पडली होती. या काळात संबंधित दालनांचा उपयोग रेकॉर्डरुम म्हणून करण्यात आला होता. रेकॉर्डरुमच्या नूतनीकरणानंतर आवश्यक फाईल्स पुन्हा तेथे हलविण्यात आल्या. निवडणूक प्रक्रिया जवळ येताच प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या दालनांसह सर्वसाधारण सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले, जे आता पूर्ण झाले आहे.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दालनांना कॉर्पोरेट लूक देण्यात आला असून, अत्याधुनिक सुविधा असलेले सभागृह उभारण्यात आले आहे. विशेषतः महापौर दालनाच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला आहे. महापौरांसाठी दिल्लीहून खास खुर्ची मागविण्यात आली असून, या खुर्चीची किंमत सुमारे ८० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या खुर्चीत कामाच्या थकव्यावर उपाय म्हणून दहा ते वीस मिनिटे वामकुक्षी घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

दरम्यान, नव्या महापौरांसमोर जनतेच्या अपेक्षांचा मोठा डोंगर उभा आहे. पाणीपट्टी न वाढवता दररोज मुबलक पाणीपुरवठा, गुंठेवारी प्रक्रिया सुलभ व सर्वसामान्यांना परवडणारी करणे, अतिक्रमणे हटवल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया राबवून योग्य मोबदला देणे, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे लाखमोलाच्या खुर्चीवर बसणाऱ्या नव्या महापौरांची जबाबदारीही तितकीच जड असणार आहे, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

786 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क