छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी पार पडलेली मतदान प्रक्रिया शांततेत आणि मोठ्या उत्साहात पूर्ण झाली. जिल्ह्यातील ६३ जिल्हा परिषद गट आणि १२६ पंचायत समिती गणासाठी एकूण १८ लाख ७३ हजार ५३ मतदारांसाठी २ हजार २८२ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या मतदानाला सुरुवातीच्या तासांत संथ प्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि सायंकाळपर्यंत अनेक केंद्रांवर रांगा लागल्या.

महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला असून अनेक गावांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक दिसून आली. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरी ७० ते ८० टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६३ जागांसाठी २८२ उमेदवार तर पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी ५३५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण ८१७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

दरम्यान, वाळूज औद्योगिक परिसरातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. मशीन बंद पडणे आणि मत नोंद न होण्यामुळे काही काळ मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करून दिल्याने मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या निवडणुकीत लोकशाहीचा अभिमान वाढवणारा क्षणही पाहायला मिळाला. पंढरपूर परिसरातील १०५ वर्षीय जयतू बी शेख मदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नसल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असा संदेश त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, “काही ठिकाणी मशीन बदलण्याव्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. अफवांवर वेळीच नियंत्रण ठेवण्यात आले असून मतदान शांततेत पूर्ण झाले आहे.” आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून निकालातून जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

343 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क