छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होत असून, मिनी मंत्रालय परिसरात निकालाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या दहा गटांसह पंचायत समितीच्या १२६ गणांचा आज कौल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून सरासरी ७२.६९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून अनेक ठिकाणी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.
मतमोजणीसाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड आणि वरिष्ठ अधिकारी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत असून अधिकाऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
तालुकानिहाय मतदानाचा टक्का पाहता सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि गंगापूर या तालुक्यांत समाधानकारक मतदान झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागात विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांनी उत्साहाने मतदान केल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, मतमोजणीसाठी विविध शासकीय इमारतींचा वापर करण्यात आला असून प्रत्येक केंद्रावर कर्मचारी आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार असून त्यानंतर ईव्हीएमद्वारे टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जातील. दुपारपर्यंत बहुतेक गटांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून कोणत्या पक्षाला बहुमत मिळते आणि स्थानिक सत्तासमीकरण कसे बदलते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*