छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअरगन सापडल्याने काल मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर ही घटना चुकून घडल्याचे स्पष्ट झाले असून संपूर्ण प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काल दुपारी आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एक संशयास्पद बॅग आढळून आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये पिस्तुलसारखी वस्तू दिसून आल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी केली आणि बॅगेची तपासणी केली.
तपासात सदर पिस्तूल ही खरी बंदूक नसून एअरगन असल्याचे समोर आले. चौकशीनंतर ही बॅग रितेश संतोष होळकर या तरुणाची असल्याचे स्पष्ट झाले. रितेश हा बीएस्सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून काही काळापासून नोकरीच्या शोधात होता. महापालिकेत कंत्राटी नोकरी मिळावी यासाठी त्याला आमदार संजय केनेकर यांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.
तो शुक्रवारी सायंकाळी आमदार कार्यालयात गेला होता. भेटीनंतर घाईगडबडीत तो बॅग तेथेच विसरून गेला. काही महिन्यांपूर्वी त्याने हौस म्हणून एअरगन खरेदी केली होती व ती बॅगेत ठेवत असल्याचेही तपासात उघड झाले.
शनिवारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ती बॅग आढळल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले. मात्र पोलिसांच्या तपासानंतर कोणताही घातपाताचा प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात रितेश होळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*