छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाईक व बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे प्रचंड आवाज करणाऱ्या टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी ४ ते रात्री ८ या अवघ्या चार तासांत शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवून २४४ दुचाकींच्या सायलन्सरची तपासणी करण्यात आली. यामध्ये मूळ सायलन्सर बदललेल्या १४१ दुचाकीस्वारांवर कारवाई करत तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
यापैकी १ लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला असून दंड भरण्यास नकार देणाऱ्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नियमबाह्य सायलन्सर लावलेल्या ९७ दुचाकींचे सायलन्सर जागेवरच काढून मूळ सायलन्सर बसवण्यात आले. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही मोहीम तीव्र करण्यात आली.
शहरातील मुख्य चौक, वर्दळीचे रस्ते आणि तरुणांची वर्दळ असलेल्या भागांमध्ये अचानक नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासोबतच समज देण्यात आली. भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण तपासणी सुरू राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी शांतता राखण्यासाठी व सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*