छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्री १ वाजेपर्यंत विशेष सुरक्षा व्यवस्था लागू राहणार आहे. शहरात ४ डीसीपी, ६ एसीपींसह तब्बल ८० अधिकारी आणि ११०० पोलिस अंमलदार तैनात असतील.

विशेषतः क्रांती चौक परिसरात सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथे ५० अधिकारी आणि ३०० पोलिस अंमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय दंगा काबू पथक आणि एसआरपीएफच्या १०० हून अधिक सशस्त्र जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांती चौकासोबतच टी.व्ही. सेंटर आणि गजानन महाराज मंदिर चौकातूनही विविध मिरवणुका मार्गस्थ होणार असल्याने त्या भागातही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार, टवाळखोर आणि समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी फ्लॅग मार्चही काढला असून, नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. बुधवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण बंदोबस्ताचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी पोलिस विभागाकडून क्रांती चौक आणि टी.व्ही. सेंटर येथे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी १ अधिकारी, २ पुरुष आणि १ महिला अंमलदार अशी टीम नियुक्त करण्यात आली आहे. महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची तीन स्वतंत्र पथके कार्यरत राहतील.

शहरातील १२ संवेदनशील प्रार्थनास्थळांना स्वतंत्र सशस्त्र पोलिसांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. तसेच १७ प्रमुख भागांतून येणाऱ्या मिरवणुकांसोबत पोलिस अंमलदार राहणार आहेत. पडेगाव, जिन्सी, सिटी चौक, नारेगाव आणि औरंगपुऱ्यासह ८२ संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंटवर उपनिरीक्षक आणि सशस्त्र अंमलदार तैनात असतील.

क्रांती चौकाकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर एपीआय, पुरुष व महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. उड्डाण पुलावर उभे राहण्यास बंदी घालण्यात आली असून, दोन्ही बाजूंना पोलिस तैनात असतील. संपूर्ण शहरात १० ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

उत्सवादरम्यान वादग्रस्त पोस्टर किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत आणि उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

708 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क