छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. या घटनेत दोन तरुणांवर अज्ञातांनी चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विटखेडा येथील रहिवासी शुभम दत्तात्रय गायकवाड (१८) आणि सिद्धांत कडूबा चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ नाचण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांत पाच ते सहा ठिकाणी किरकोळ हाणामारीच्या घटना नोंदवण्यात आल्या. एका ठिकाणी स्टेजवर घोषणा देण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याचीही माहिती आहे.

याच वेळी मिरवणुकीतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनीही संधी साधली. क्रांती चौक परिसरातून सुमारे ७० ते ८० मोबाईल फोन आणि महिलांच्या गळ्यातील अंदाजे २० मंगळसूत्रे लंपास करण्यात आल्याची नोंद आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दुचाकी, मोबाईल आणि मंगळसूत्र चोरीच्या संशयावरून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही घडलेल्या या घटनांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,175 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क