छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याची चाचणी देताना मैदानावरच मृत्यू झाला. या घटनेमुळे भरती प्रक्रियेला उपस्थित उमेदवारांमध्ये शोककळा पसरली असून काही काळासाठी भरती प्रक्रिया थांबविण्यात आली.

मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे (वय २३) असे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून नियमित व कठोर सराव करत होता. पोलिस भरतीसाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाला होता. आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. १६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संग्रामने धावण्यास सुरुवात केली; मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

धावत असतानाच तो अचानक मैदानावर कोसळला. तत्काळ उपस्थित पोलिस कर्मचारी व वैद्यकीय पथकाने त्याच्याकडे धाव घेत प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मैदानावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

संग्राम हा अत्यंत जिद्दी व मेहनती स्वभावाचा असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पोलिस दलात भरती होण्याचा त्याचा निर्धार होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका किंवा तीव्र शारीरिक ताण कारणीभूत असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,911 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क