छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची समस्या पुन्हा तीव्र होऊ लागली आहे. मुख्य जलवाहिनीवर अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या नळ कनेक्शनमुळे नियमितपणे मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून शहरातील विविध भागात ही कारवाई सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला २०० एमएलडी वाढीव पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र सातत्याने प्रयत्न करूनही या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढीव पाणी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ चा मुहूर्त देण्यात आला. आता मार्च २०२६ पर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन दिले जात असले तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार कंपनीच्या कामाचा वेग पाहता मार्चअखेरपर्यंतही वाढीव पाणी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शहरातील उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, वितरण व्यवस्थेतील गळती रोखली जावी आणि अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यात यावीत, यावर महापालिका प्रशासन भर देत आहे. अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर थेट कनेक्शन घेतल्यामुळे काही भागात मुबलक पाणी मिळते, तर इतर भागात सहा ते आठ दिवसांनी केवळ दोन ते तीन तासच पाणी येते. त्यातही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

पाणी वितरणातील या असमतोलाबाबत अनेक नगरसेवकांनीही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने विशेष पथक स्थापन केले असून ते शहरातील विविध भागात जाऊन तपासणी करणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

290 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क