छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १०० ते १२० जणांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा लेणी येथे पर्यटनासाठी आलेले पर्यटक बस पार्किंग परिसरात थांबले असताना आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक पर्यटकांवर झडप घातली. या हल्ल्यात श्रीलंका येथील सुमारे ८० पर्यटकांचा गट, थायलंड येथील १० पर्यटकांचा गट, तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर येथील १० पर्यटक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. मधमाशांच्या अचानक हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकजण सुरक्षिततेसाठी इकडे-तिकडे धावू लागले.
दरम्यान, एका बस चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील पर्यटकांना खाली उतरू न देता बस सुरक्षित स्थळी वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत जबलपूर येथील सात वर्षीय चिमुरडीच्या चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा सुजला असून तिची आईदेखील जखमी झाली आहे.
घटनेनंतर जखमी पर्यटकांना तत्काळ अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच परिसरातील काही खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केले असून बहुतेकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
अजिंठा लेणी परिसरात यापूर्वीही मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या भागात तातडीने उपाययोजना कराव्यात आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*