छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस सेंटरमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव सोमनाथ आत्माराम काकडे (वय ३०, रा. वडखा, पो. वरझडी) असे आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोडी येथील आयएनसी सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी बारा टायरचा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीए ८०१७) फिटनेस टेस्टसाठी आरटीओ कार्यालयात दाखल झाला होता. या ट्रकची आयएनसी सेंटरमध्ये फिटनेस तपासणीसाठी पूर्वनियोजित अपॉइंटमेंट होती.
ट्रकचालक मच्छिंद्र पारसनाथ धनाड (वय ३६, रा. पालखेडा, ता. वैजापूर) यांनी ट्रक दुसऱ्या गेटमधून आरटीओ कार्यालयाच्या परिसरात आणला. त्यानंतर आयएनसी सेंटरच्या पार्किंगमध्ये ट्रक व्यवस्थित लावण्यासाठी चालक ट्रक पुढे-मागे घेत होता. याच वेळी ट्रक थोडा पुढे नेल्यानंतर तो रिव्हर्स घेत असताना चालकाच्या उजव्या बाजूच्या चाकासमोर सोमनाथ काकडे आले. काही क्षणांतच बारा टायरच्या ट्रकची धडक त्यांच्या छातीला बसली आणि ते गंभीर जखमी झाले.
घटना घडताच परिसरातील नागरिक आणि आयएनसी सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली. योगायोगाने त्या ठिकाणी फिटनेस टेस्टसाठी आलेली रुग्णवाहिका उपस्थित होती. त्या रुग्णवाहिकेतून सोमनाथ काकडे यांना तातडीने वाळूज परिसरातील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुपारी सुमारे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शेळके व अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर अपघातातील ट्रक दौलताबाद पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला असून ट्रकचालक मच्छिंद्र धनाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*