छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या काही भू-राजकीय घडामोडींमुळे देशात इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या अफवा आणि अपूर्ण माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, कारण छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण व्यवस्था नियमितपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात घरगुती एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन आणि ब्यूटेन या घटकांचा वापर प्राधान्याने एलपीजी निर्मितीसाठी करण्यास सांगण्यात आले आहे. तयार होणारा एलपीजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या – इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) – यांच्यामार्फत नागरिकांना पुरवठा केला जाणार आहे.
तेल विपणन कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे की घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहील. याशिवाय रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या गैर-घरगुती क्षेत्रांनाही आवश्यकतेनुसार एलपीजीचा पुरवठा केला जाणार आहे. इतर गैर-घरगुती क्षेत्रांच्या मागण्यांचे परीक्षण करून त्यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना घरगुती एलपीजी गॅसचे वितरण सुरळीत राहावे यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हास्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच गॅस एजन्सींमार्फत नागरिकांना वेळेवर सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या सर्व उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यकपणे गॅस सिलिंडरचा साठा करू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. एलपीजीचा पुरवठा नियमित सुरू असून मागणीनुसार सिलिंडर उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी अफवांपासून दूर राहून शांतता राखावी आणि आवश्यक तेवढ्याच प्रमाणात गॅसचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*