छत्रपती संभाजीनगर : शहरातील लिंक रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (२१ मार्च) रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास कावरू हाऊस हॉटेलमध्ये चार जणांनी दारू पिल्यानंतर बिल देण्यास नकार देत दादागिरी केली. एवढेच नव्हे तर त्यांनी मॅनेजरला मारहाण करत तलवार काढून हॉटेलमध्ये दहशत निर्माण केली.
या प्रकरणी आकाश कांतीलाल गोलेच्छा (वय २९, रा. राजाबाजार) यांनी सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते संबंधित हॉटेलमध्ये मागील दोन महिन्यांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून विकास रहाटवाडे, सारंग तरमगे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित आरोपी रात्री हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी दारूची ऑर्डर दिली. काही वेळातच त्यांनी तब्बल १४ हजार ३३३ रुपयांची दारू पिली. मात्र बिल देण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार देत “अमराठी कामगार चालणार नाहीत” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी एका आरोपीने मॅनेजरच्या कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने तलवार काढून हॉटेलमध्ये फिरवत सर्वत्र दहशत निर्माण केली.
सुमारे १३ मिनिटे हा थरार सुरू होता. त्यामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकही भयभीत झाले होते. आरोपींनी मॅनेजरला धमकावत माफी मागायला लावली आणि पुढे कामावर येऊ नये, अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, हॉटेल मालक रमण कपूर यांना बोलावण्यात आले. मात्र आरोपींनी त्यांच्यासमोरही दादागिरी करत बिल न भरता कारने तेथून पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*