छत्रपती संभाजीनगर : देशाच्या महाजनगणनेचा बिगुल वाजला असून यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने मोजणी केली जाणार आहे. १ मेपासून शहराच्या कानाकोपऱ्यात मोबाइल अॅपच्या माध्यमातून घराघरांची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. कागद-पेनाला पूर्णपणे फाटा देत केंद्र सरकारने ही अत्याधुनिक पद्धत अवलंबली आहे. यासाठी महापालिकेकडून तब्बल ३८०० कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली असून त्यापैकी १० टक्के कर्मचारी बॅकअप म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत.
या जनगणनेचा रोडमॅपही स्पष्ट करण्यात आला आहे. १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘सेल्फ इन्युमरेशन’ची संधी देण्यात आली आहे. या काळात नागरिक स्वतः केंद्राच्या विशेष अॅपवर आपली व कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. जे नागरिक ही नोंदणी करू शकणार नाहीत, त्यांच्या घरी १६ मेपासून नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. त्यामुळे एकही कुटुंब या प्रक्रियेतून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने काळजी घेतली आहे.
यंदाची जनगणना केवळ लोकसंख्येचा आकडा मांडणारी नसून ती शहराच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा आरसा ठरणार आहे. अॅपमध्ये एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार असून त्यातून नागरिकांच्या जीवनमानाचा सखोल अभ्यास केला जाईल. घर कच्चे की पक्के, स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरले जाते, घरात दुचाकी किंवा चारचाकी आहे का, मोबाइल व इंटरनेटची उपलब्धता किती आहे, अशा प्रश्नांद्वारे कुटुंबांची आर्थिक स्थिती व जीवनशैलीचा अंदाज घेतला जाणार आहे.
प्रशासकीय स्तरावरही मोठी तयारी करण्यात आली आहे. उपआयुक्त विलास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्यात आले आहे. पारंपरिक वॉर्ड पद्धतीऐवजी शहराचे १० मुख्य ब्लॉक्समध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सुमारे १२० ते १४० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. या कामासाठी महापालिका कर्मचारी, इतर सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांची मदत घेण्यात येत आहे.
डिजिटल पद्धतीमुळे रिअल टाइम डेटा अपडेट होणार असून पारदर्शकता वाढणार आहे. याआधी कागदपत्रांच्या ढिगाऱ्यामुळे डेटा एन्ट्रीसाठी महिने लागत असत, मात्र आता ही प्रक्रिया जलद आणि अचूक होणार आहे. प्राप्त माहितीच्या आधारे भविष्यात पाणीपुरवठा, रस्ते, वीज वापर यांसारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. त्यामुळे ही जनगणना शहराच्या विकासाचा महत्त्वाचा पाया ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*