छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी शुक्रवारी सायंकाळी चितेगाव परिसरात अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पैठण रोडवरील चितेगावजवळील बी. जी. अप्लायन्सेस कंपनीसमोर सायंकाळी सुमारे ६:४० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. एअर व्हॉल्व्हखालील भागात झालेल्या गळतीमुळे प्रचंड दाबाने पाणी उसळून थेट रस्त्यावर आले. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ फारोळा केंद्रातून येणारा पाणीपुरवठा बंद केला. उपअभियंता एम. एम. बाविस्कर, आशिष वाणी, सुहास लोहाडे आणि ऋषिकेश निनाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून फुटलेल्या पाइपलाइनचा भाग शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ही जलवाहिनी मोठ्या व्यासाची असल्याने दुरुस्तीचे काम किचकट असून, ते पूर्ण होण्यासाठी शनिवारची पहाट उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच पंपिंग पुन्हा सुरू केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या बिघाडाचा सर्वाधिक फटका सिडको, हडको, गारखेडा तसेच जुन्या शहरातील नागरिकांना बसला आहे. शुक्रवारी रात्रीचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजित टप्पे एका दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, मागील आठवड्यातही याच भागात मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे अद्याप पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नसतानाच पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

641 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क