छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) अवघ्या सहा तासांत शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये एकूण ८३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.

शहरातील वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि सोयीस्कर ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. राँग साईडने वाहन चालवणे हे अपघातांचे एक मोठे कारण ठरत असून त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. अनेक वाहनचालक बेजबाबदारपणे नियम मोडत असल्याने वाहतूक कोंडी वाढते आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी मोंढा नाका, हायकोर्ट सिग्नल, जिल्हा न्यायालय चौक सिग्नल, महावीर चौक आणि ओअॅसिस चौक या पाच ठिकाणी स्वतंत्र पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. यामुळे काही ठिकाणी सुरुवातीला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.

सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी सांगितले की, ही मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना कोणतीही अडचण येणार नाही, मात्र नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,019 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क