छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने ‘एक कॅमेरा… शहराच्या ही सुरक्षेसाठी’ ही विशेष जनसहभाग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांनी आपल्या घराबाहेर, दुकानासमोर किंवा इमारतीच्या परिसरात किमान एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पोलिस यंत्रणेसोबत नागरिकांच्या सहकार्याने शहरभर प्रभावी निरीक्षणाचे जाळे उभे करणे होय. आयुक्त पवार यांनी सांगितले की, बसवलेले कॅमेरे सतत कार्यरत असणे, रस्त्याकडे योग्य दिशेने बसवणे आणि त्यामधील दृश्य नोंदी सुरक्षितपणे साठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गरज पडल्यास ही नोंद पोलिसांना उपलब्ध करून दिल्यास गुन्हे तपासात मोठी मदत होऊ शकते.
या मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. निरीक्षण कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांवर मानसिक दबाव निर्माण होतो आणि अनेक ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचेही आढळून आले आहे. तसेच, गुन्हा घडल्यानंतर आरोपींची ओळख पटवणे, त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि न्यायालयात ठोस पुरावे सादर करणे यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत उपयुक्त ठरते.
दरम्यान, कॅमेरे बसवताना नागरिकांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इतरांच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे, शेजाऱ्यांच्या खासगी जागेकडे कॅमेरे न वळवणे आणि इमारतींमध्ये कॅमेरे बसवताना सर्व रहिवाशांची संमती घेणे आवश्यक आहे. कॅमेरे फक्त प्रवेशद्वार, जिने आणि पार्किंग यांसारख्या सामायिक जागांपुरते मर्यादित ठेवावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे नागरिक आणि पोलिस यांच्यातील समन्वय वाढून शहर अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*