छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशिदपुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ‘खमर विला’ (प्लॉट क्र. १६) या ठिकाणी मंगळवारी (दि. २८) पहाटे सुमारे २ वाजता टाकलेल्या धाडीत गर्भपातासाठी लागणारे साहित्य, सोनोग्राफी प्रोब तसेच विविध औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरात महिनाभरात उघडकीस आलेले हे तिसरे अवैध रॅकेट असल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा उलगडा एका गर्भवती महिलेची प्रकृती अचानक खालावल्याने झाला. संबंधित महिलेला २७ एप्रिल रोजी सायंकाळी गर्भपातासाठी या ठिकाणी आणण्यात आले होते. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या; मात्र त्यानंतर पहाटे तिची तब्येत बिघडल्याने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना कळवले आणि तात्काळ संयुक्त धाड टाकण्यात आली.

या कारवाईत शाहिदा परवीन सय्यद (५१), नसरीन वजीर शेख (४७) आणि सय्यद इर्शाद अहमद (६१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, गर्भपातासाठी येणाऱ्या महिलांची तपासणी सिडको एन-६ येथील ‘बिटेल डायग्नोस्टिक पॅथलॅब’मध्ये केली जात होती. या लॅबचे चालक मंगेश थोरात, मीनाक्षी थोरात तसेच संबंधित गर्भवती महिलेची आई अशा एकूण सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, शहरात सुरू असलेल्या अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

829 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क