छत्रपती संभाजीनगर : शहरात सजलेल्या लग्नमंडपात सुरू असलेला बालविवाह दामिनी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. सुमारे ४०० ते ५०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मंडप सजलेला, जेवणावळी सुरू आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना अचानक पोलिसांनी एंट्री करताच वऱ्हाड्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

दुपारी सुमारे १२:३० वाजता दामिनी हेल्पलाइनवर एका गुप्त बातमीदाराकडून बालविवाह सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कल्पना खरात, अंमलदार साक्षी चंद्रे, पवार आणि चालक अलीम शेख यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मंडपात पोहोचून पाहणी केली असता वडोद तांगडा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील १५ वर्षीय मुलगी (नाव बदललेले – सुनंदा) आणि जालना येथील २८ वर्षीय युवक (नाव बदललेले – सौरभ) हे नवरी-नवरदेवाच्या वेशात दिसून आले. यानंतर महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी सचिन दौंड यांनी मुलीचे आधार कार्ड व जन्मतारखेचा दाखला तपासला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत कोणताही वाद न होता हा विवाह थांबवला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली. मुलीच्या पालकांना महिला व बाल विकास समितीसमोर आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या घटनेमुळे बालविवाहाविरोधातील प्रशासनाची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांनीही अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

848 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क