छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर हातात पिस्तूल, कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन रील्स तयार करत स्वतःला ‘भाई’, ‘दादा’, ‘डॉन’ किंवा ‘किंग’ म्हणून सादर करणाऱ्या टवाळखोरांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर आता थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

गेल्या काही वर्षांत इन्स्टाग्राम, फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुंडगिरीची गाणी, शस्त्रांचे प्रदर्शन आणि कुख्यात गुन्हेगारांचे गौरव करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. महाविद्यालयीन युवक, बेरोजगार तरुण तसेच गल्लोगल्लीतील काही टवाळखोर स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे रील्स पोस्ट करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी शहरात ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे २२० संशयित सोशल मीडिया आयडी पोलिसांनी शोधून काढले आहेत. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचे समर्थन करणारे किंवा त्यांचे उदात्तीकरण करणारे रील्स पोस्ट करणाऱ्यांनाही मूळ गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी स्पष्ट केले.

सायबर पोलिसांनी केंद्रीय ‘सहयोग पोर्टल’च्या माध्यमातून आतापर्यंत ८४६ सोशल मीडिया खाती बंद केली आहेत. त्यापैकी २१८ खाती सराईत गुन्हेगारांची होती. विशेष म्हणजे एकदा खाते ब्लॉक झाल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावरून पुन्हा नवीन सोशल मीडिया खाते उघडणेही शक्य होणार नाही.

गुंडगिरीचे प्रदर्शन, शस्त्रांसह व्हिडिओ तयार करणे, धमक्या देणे किंवा गुन्हेगारांचे गौरव करणारे पोस्ट शेअर करणे आता चांगलेच महागात पडणार असून, अशा कृत्यांवर पोलिसांची करडी नजर कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

751 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क