छत्रपती संभाजीनगर : आगामी कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी येथे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी ऑडिओ-व्हिडिओ डिजिटल गाइड टूर प्रणाली सुरू केली आहे. या सुविधेमुळे पर्यटकांना ऐतिहासिक लेण्यांची अचूक माहिती सहज उपलब्ध होणार असून तोतया गाइडच्या फसवणुकीवरही नियंत्रण येणार आहे.
अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र अनेकदा गाइडची संख्या कमी असल्याने पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते किंवा काही तोतया गाइड चुकीची माहिती देऊन पर्यटकांची दिशाभूल करतात. ही समस्या लक्षात घेऊन लेण्यांमध्ये विविध ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पर्यटक आपल्या स्मार्टफोनद्वारे हे क्यूआर कोड स्कॅन करताच संबंधित लेणीचा इतिहास, चित्रकला, शिल्पकला आणि त्यामागील सांस्कृतिक वारसा याची माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात मिळणार आहे.
या डिजिटल गाइड प्रणालीचे अनावरण तत्कालीन पुरातत्त्व अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली भंतेजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे, एमटीडीसीचे व्यवस्थापक राज पाटील, संरक्षण सहायक तसेच अजिंठा लेणीचे मनोज पवार उपस्थित होते.
पर्यटकांना भाषेची अडचण येऊ नये आणि प्रत्येक शिल्पामागील इतिहास सविस्तर समजावा, या उद्देशाने हे विशेष अॅप विकसित करण्यात आले आहे. अजिंठा लेणी क्रमांक १, २, ४, ९, १६ आणि २६ समोर डिजिटल बोर्ड लावण्यात आले असून एकूण ११ बोर्डांपैकी २ भिंतीवर तर ९ फिरत्या स्टँडवर बसविण्यात आले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*