छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले असताना, वाळूज परिसरातील एका विद्यार्थ्याने आपल्या वेगळ्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बजाजनगर येथील शहीद भगतसिंग प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या युवराज सुनील नाईकवाडे या विद्यार्थ्याने दहावीच्या सर्व विषयांत किमान उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ३५ गुण मिळवत यश संपादन केले. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्व विषयांमध्ये त्याला नेमके ३५ गुण मिळाले आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या युवराजची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. युवराजचे मूळ गाव बीड जिल्ह्यात असून गेल्या काही वर्षांपासून त्याचे कुटुंब रोजगारासाठी वाळूज परिसरात वास्तव्यास आहे. त्याचे वडील कंत्राटी मजूर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने युवराजला खासगी शिकवणी लावणे शक्य झाले नाही. मात्र शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
“मला नापास व्हायचे नव्हते. फक्त पास होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला,” अशी भावना युवराजने व्यक्त केली. शाळेतील शिक्षकांनीही त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवत त्याला वेळोवेळी पुस्तके, मार्गदर्शन आणि मानसिक आधार दिला. निकाल समजल्यानंतर युवराजच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
युवराजची ही यशोगाथा केवळ गुणांची नाही, तर कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीची आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातून त्याचे कौतुक होत असून अनेक विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*