छत्रपती संभाजीनगर : कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे वैजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच ट्रॉलीभर कांदा ओतून संताप व्यक्त केल्याची घटना बुधवारी (ता. १३) लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घडली. या घटनेमुळे काही काळ बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी विश्वनाथ कचरू उगले यांनी मोठ्या आशेने २० क्विंटल कांदा ट्रॅक्टरमधून लासूर स्टेशन मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला होता. मात्र, लिलावावेळी त्यांच्या कांद्याला अवघा १०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने ते हताश झाले. वाहतूक, मजुरी आणि इतर खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या उगले यांनी ट्रॅक्टर थेट मार्केटच्या मुख्य गेटमध्ये उभा करून सर्व कांदा रस्त्यावर ओतून दिला.
भरउन्हात कांद्याच्या ढिगाऱ्यावर झोपून त्यांनी व्यापारी व कृषी व्यवस्थेविरोधात तीव्र निषेध नोंदवला. त्यांच्या या आंदोलनाने उपस्थित शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. “बियाणे, खते, औषध फवारणी, पाणी आणि रात्रंदिवस केलेली मेहनत याचा काहीच मोबदला मिळत नसेल, तर शेतकऱ्याने जगायचे कसे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
विश्वनाथ उगले यांना कांदा बाजारात आणण्यासाठी ट्रॅक्टर भाडे १७०० रुपये, मजुरी १००० रुपये आणि तोलाईसाठी २०० रुपये असा एकूण २९०० रुपयांचा खर्च आला होता. मात्र, २० क्विंटल कांद्याची एकूण पट्टी केवळ २००० रुपये झाली. त्यामुळे चार महिन्यांची मेहनत वाया जाऊन खिशातून ९०० रुपये भरण्याची वेळ त्यांच्यावर आली.
घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सचिव संतोष रणयेवले यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याची समजूत काढली. व्यापाऱ्यांशी चर्चा करून कांद्याला प्रतिक्विंटल ५० रुपये वाढीव दर आणि गाडीभाड्याची नुकसानभरपाई देण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर परिस्थिती निवळून लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*