छत्रपती संभाजीनगर : लांझी-हिरापूर शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने चार महिन्यांच्या वासरावर हल्ला करून त्याला पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत जागरण करत लाठी-काठ्या आणि कुऱ्हाडी घेऊन पहारा दिला.
वाळूज परिसरातील खाम नदीकाठी वसलेल्या लांझी-हिरापूर गावात २६ मे रोजी प्रथम बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यावेळी नानासाहेब देवकर यांच्या शेतातील घराजवळ एका शेळीवर हल्ला करून बिबट्याने तिचा फडशा पाडला होता. त्यानंतर २९ मे रोजी विलास आधाने यांच्या एका बोकडावर हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनांनंतर गावकऱ्यांनी तातडीने वन विभागाला माहिती देत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वन विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ९ जून रोजी रात्री कैलास आधाने यांच्या गोठ्यावर बिबट्याने धाड टाकत चार महिन्यांच्या वासरावर हल्ला केला आणि त्याला पळवून नेले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाहेर पडले. रात्री बारा वाजेपर्यंत परिसरात गोंधळाचे वातावरण होते.
दरम्यान, घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*